*★जरूर वाचा★*
*अतिशय सुंदर माहिती*
प्रश्न : मन म्हणजे काय ?
उत्तर : मन हे वायुस्वरूपी आहे. वायूच्या गतीत आंदोलने आहेत, म्हणून त्या वायूलाच मन म्हटले आहे. नाहीतर मन म्हणून स्वतंत्र काही नाही, मन नावाचा पदार्थ नाही.
देहाचे मार्फत दृश्याशी होणारे इंद्रियांचे तादात्म्य म्हणजे मन. देहामार्फत व्यवहार केल्याने मनात संकल्प येतो आणि मन गढूळ होते. एकच मन असंख्य विचार निर्माण करून जीवाला हैराण करते. मनाचे परिणाम शरीरावरही होतात. काही लोक मनालाच आत्मा मानतात. पण ते चूक आहे. मनापेक्षा आत्मा वेगळा आहे. मन आणि आत्मा एक नव्हेत.
मनाच्या गतीमार्फत सर्व व्यवहार घडतात. मनामुळे संवेदना, संवेदनेतून ज्ञान, ज्ञानातून प्रेरणा, प्रेरणेतून कर्म असे एकमागून एक निर्माण होतात.
मन हे जड व चैतन्य यांनी बनलेले आहे. मनामध्ये जडाचेही गुणधर्म आहेत, तसेच चैतन्याचेही गुणधर्म आहेत. जडाचे आकर्षण असल्यामुळे मन बाहेर फाकते. जर मनाची ओढ जडाकडे, शरीराकडे नसती, तर सर्वजणच विदेही झाले असते. मनाच्या अस्तित्वाशिवाय व्यवहार नाही, हे दृश्य नाही, माझे-तुझे नाही. जर मनच अस्तित्वात नसते, तर `सृष्टि' हा शब्द देखील उरला नसता.
प्राणाच्या हातात मनाची नाडी आहे. मनाची गति प्राणाच्या गतीशी तादात्म्य पावली की दृश्य मावळणार आहे.
प्रश्न : परमार्थात मनाला काय स्थान आहे ?
उत्तर : मन चंचळ आहे. मन आवरणे हे परमार्थात महत्त्वाचे आहे. मन दृश्यामागे धावते, आपण मनामागे धावतो. जेव्हा मनाचे खरेखुरे ज्ञान होते, मनाचे संकल्पविकल्पात्मक स्वरूप समजते, तेव्हा परमार्थाच्या वाटचालीला सुरवात होते.
मनाला चैतन्याचे आकर्षण यावयास हवे. एकदा का मनाला चैतन्याचे आकर्षण निर्माण झाले की मनाचे मनत्व उरत नाही. जडाचे गुणधर्म बाजूला झाल्याशिवाय मनाला चैतन्याचे आकर्षण होता होत नाही. मनाचे परिवर्तन होणे हे परमार्थात आवश्यक आहे. पण ते कठिण आहे. त्यासाठी प्रयत्न आवश्यक आहे.
मन हे भगवंताचे नामाशी एकरूप होणे हे महत्त्वाचे आहे. मनाचे संकल्पविकल्प जर नाममय झाले, तर ती निर्विकल्प स्थितीत नेणारी एक सोपी युक्ति आहे.
मनाचे मनत्व नाहीसे होणे यापरता परमार्थात दुसरा श्रेष्ठ अनुभवच नाही. मन मुरल्यावर जे उरते तेच देवाचे दर्शन आहे, आणि तोच आत्मसाक्षात्कार आहे.
प्रश्न : चित्त म्हणजे काय ? परमार्थात चित्ताला काय महत्त्व आहे ?
उत्तर : चिंतन हे चित्ताचे स्वरूप आहे. चित्त आणि मन हे एकच नव्हेत. चित्त आणि मन यांत फरक आहे.
चित्त हे चैतन्याचा एक अंश आहे. चित्ताचा खरा विषय चैतन्य आहे. पण व्यवहारात तो विषय चित्ताला मिळत नाही. म्हणून चित्त हे व्यवहारात अनेक विषयांचे चिंतन करीत रहाते.
चित्ताचे केंद्रीकरण हे महत्त्वाचे आहे. व्यवहारातसुद्धा चित्त हे एकाग्र झालेशिवाय सुख होत नाही. चित्त सुखी असेल तर अंगावर कितीही दुःखे येऊन कोसळोत, त्यांची तेथे मातब्बरी नाही. दृश्य, देह, व्यवहार यांत समाधान नाही. समाधानाचे वर्म चित्ताच्या एकाग्रतेत आहे. समाधान व चित्ताची एकाग्रता यांचा निकटचा संबंध आहे. चित्ताच्या एकाग्रतेशिवाय समाधान होत नाही. चित्ताचे समाधान हे आगळेवेगळे आहे.
परमार्थ करताना चित्त चैतन्यात मिसळते. कारण चित्त म्हणजे चैतन्यच आहे. चित्ताची एकाग्रता हीच समाधि आहे. देव हा चित्तामध्ये साक्षात्कारास येतो.
प्रश्न : व्यवहारात माणूस `मी' `मी' म्हणत असतो. तो अहंकाराने वागत असतो. या अहंकाराचे स्वरूप काय आहे ?
उत्तर : माणूस म्हटला की तेथे अहंकार आलाच. उपाधीमुळे अहंकाराचे स्फुरण होते व तो संवेद्य होतो. देहाच्या जाणीवेने देवाचा विसर पडल्याने, जीवनाचे परिभ्रमणात अहंकाराची लाट उठत असते. अहंकार वायुरूप आहे; जाणीव म्हणजे अहंकार. वायुरूपात जाणीव असणे हाच अहंकार. जाणीव नसणे म्हणजे अहंकार नसणे.
गुणरूपात अहंभावाचे तादात्म्य झाले की त्यालाच अहंकार म्हणतात. अहंकार हा श्वसनात गतिरूप आहे. अहंकार हा देहाशी संलग्न आहे. भ्रमामुळे अहं हे स्फुरण होते.
अहंकाराने माणसाचा हात सदा आपल्या छातीवर असतो. तो गेला (म्हणजे माणूस मेला) तरी शेवटी हात छातीवरच.
अहंकार येताना चट्दिशी येतो. परंतु जाताना चट्दिशी जात नाही. जसे :- रोग येतो लवकर पण जातो उशीरा.
अहंकार हा भुतासारखा आहे. त्याला कोणते तरी एक झाड लागते. देहाचा अहंकार सुटला की तो चैतन्याला चिकटतो व चैतन्यरूप होतो.
अहंकाराने मनुष्य फलाशा धरून कार्य करतो. मग अहंकाराअंती त्याला सुखदुःख होते. अहंकार असेल तर निष्काम कर्म करता येत नाही.
खरे म्हणजे मीपणाला काही अर्थच नाही. सर्व परमेश्वरच करीत असतो. भूगोलातील अक्षांश-रेखांश व व्यवहारातील मी-तू सारखेच आहेत. खरे म्हणजे माणूस काहीच करीत नाही. परंतु अहंकारामुळे `मी करतो' असे आपण मानतो. परमेश्वराची सत्ता नसती, तर माणूस काय करू शकला असता? `मी करतो' म्हणून कोणतीही गोष्ट होत नाही. जेथे अहंकार येतो, तेथे बिघाड होतो. निंबरगीकर महाराजांचे एक वचन आहे, `जेथे अहंकार तेथे नाश.' निंबरगीकर महाराजांनी सांगितले आहे :- `ज्या गोष्टींबद्दल अहंकार येतो ती गोष्ट नाहीशी होते.'
शरीराचा अहंकार धरणे हा अपराध आहे. अहंकाराने कर्म बंधनकारक होते. `मी करतो' हे म्हणणे म्हणजे भ्रांति आहे. मीपणा म्हणजे अज्ञान आहे. अहंकाराने जीव नाडला जातो.
प्रश्न : `मी करतो' या भूमिकेतून अहंकाराने परमार्थ करता येईल काय ?
उत्तर : परमेश्वराला अहंकार मुळीच खपत नाही. अहंकाररहित होणे हेच परमार्थात महत्त्वाचे आहे. माणसाने अहंकार करू नये. सर्व कर्तृत्व परमेश्वराचे आहे, अशी भावना पाहिजे. माणसाने निरहंकार बुद्धीने काम करावे म्हणजे परमेश्वर आपोआप त्याला भेटेल. परमेश्वर आला की अहंकार नाही. अहंकार सुटणे म्हणजे एका दृष्टीने मरणच होय. अहंकार गेला की साक्षात्कार होतो. मीपणा गेल्यावर संसार ब्रह्मस्वरूप आहे. मीपणा गेला की भेद गेला. आत्मदर्शनास मुख्य गोष्ट म्हणजे अहंकार जाणे.
अहंकार गेल्याविना खर्या साधनाला सुरवात होत नाही. शेकडा ९९॥ टक्के लोकांना परमार्थातील साधन जमत नाही, याचे कारण ते लोक `मी'ची जाणीव ठेवून साधन करतात.
मीपणाचा निरास झाल्यावर साक्षात्कार आहे. साक्षात्कार झाल्यावर अहंकार उरत नाही. अहंकाराचा निरास झाल्यावर, साक्षात्काराला अजिबात वेळ लागत नाही.
प्रश्न : जो अहंकार घातक आहे, तो दूर करण्याचे काही उपाय आहेत की नाहीत ?
उत्तर : आत्मदर्शनास मुख्य गोष्ट म्हणजेच अहंकार जाणे. अहंकार नाहीसे करण्याचे मार्ग /उपाय असे आहेत :-
१. अहंकार अत्यंत कमी करणे किंवा तो अमर्याद करणे. अहंकार हा अत्यंत क्षुद्रतेने किंवा त्याची व्याप्ति वाढवून घालविता येतो.
२. निंबरगीकरमहाराज म्हणत :- `अहंकार आल्यास त्याची छी-थू करून त्याला घालवून द्यावे.' एखाद्या माणसाची वरचेवर छी-थू केल्यावर तो पुनः आपणाकडे येणार नाही. त्याप्रमाणे अहंकाराची वरचेवर छी-थू केल्यास, तो पुनः आपल्याकडे येणार नाही.
३. विचाराने अहंकार जातो. विचाराने काही काल अहंकार जातो. विचाराने अहंकार गेला की साधनाने अहंभावाचा निरास होतो. स्फुरण, नाद व आकाश एक झाले की अहंभावाचा विलय होतो.
४. अहंकार घालविणेस बोधाचे रसायन आहे. पण बोध ग्रहण करणेची तळमळ आपल्या ठिकाणी पाहिजे.
५. उपाधिभूतजीवन हे शरीराशी तादात्म्य पावले आहे. पण त्याचे स्वतःशीच तादात्म्य झाले की अहंकाराचा निरास होतो.
६. अधोगामी जीवन ऊर्ध्वगामी झाले की अहंकार नष्ट होतो.
७. त्रिविध तापाने अत्यंत तप्त झालेल्याचा अहंकार जातो.
८. द्रष्टेपणाने अहंकार जातो. आपले ठिकाणी अहंकार आहे की नाही हे ज्याला कळते तो द्रष्टा.
९. साक्षी हा साक्षिरूपाने राहील तर अहंकाराची गति नाहीशी होते.
१०. सद्गुरूंना शरणागति म्हणजे निरहंकार.
११. विचारांचा द्रष्टा होऊन अगर गुरूंनी सांगितलेल्या गतीवर दृष्टि ठेवून अगर त्या गतीत लय पावून अहंकाररहित स्थिति गाठता येते.
१२. श्वसन -क्रिया मंद झाल्यास अहंकार जातो.
१३. यथार्थ ज्ञानाने अहंकार जातो.
No comments:
Post a Comment