Thursday 18 October 2018

ज्वारी =====

ज्वारी
=====

आपल्या जेवणामध्ये प्रामुख्याने पुरी, चपाती, नान किंवा पराठ्याचा समावेश असतो. रोज तेच खातायना मग आता ज्वारीच्या भाकरीची चव चाखा. ज्वारीची भाकरी ही पचण्यास अतिशय सोपी असते. ती मध्यम तीव्रतेच्या फ्लेमवर भाजली जाते आणि आरोग्याच्यादृष्टीने अतिशय गुणकारी ठरते. त्यामुळे रोज नाही पण आठवड्यातून किमान दोन-तीन वेळा तरी ज्वारीच्या भाकरीचा आहारात समावेश करावा. रजोवृद्धीच्या काळात ज्वारीची भाकरी आणि ज्वारीपासून बनवलेले पदार्थ खाल्ल्यास हार्मोन्सचे असंतुलन होण्याची समस्या निर्माण होत नाही. ज्वारीचे पदार्थ खाल्ल्याने ब्रेस्ट कॅन्सर नियंत्रणात राहतो, असे अभ्यासावरून सिद्ध झाले आहे. ज्वारीच्या भाकरीचे अनेक गुणधर्म आहेत, ज्यामुळे आपणास नक्कीच फायदा होणार आहे. त्यामुळे शक्‍यतो ज्वारीचा आहारात समावेश करुन घ्याच.

ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्‌सचे प्रमाण जास्त असल्याने शरीरास पटकन ऊर्जा मिळते. कमी खाऊनही पोट भरल्याची जाणीव होते. ज्वारीमध्ये असणाऱ्या अमिनो ऍसिड्‌समधून शरीरास मुबलक प्रोटीन्स मिळतात. तसेच फायबर्स असल्याने सहज पचन होते. बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाण्याची सवय लावून घ्यावी. त्यामुळे मूळव्याधाचा त्रास होत नाही. तसेच ज्यांना किडनी स्टोनचा त्रास टाळायचा असेल त्यांनी नक्कीच ज्वारीची भाकरी आहारात आणावी. ज्वारीतील पोषणतत्त्वामुळे किडनी स्टोनला दूर ठेवता येते.

ज्वारीमध्ये असणाऱ्या निऍसिनमुळे रक्तातील कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. तसेच ज्वारीमधील फायटो केमिकल्समुळे हृद्यरोग टाळता येतात. ज्वारीमधल्या पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मिनरल्समुळे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते. भाकरीत लोह मोठ्या प्रमाणात असते. ऍनिमियाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाल्ल्यास त्यांना फायदा होतो. लाल पेशींची वाढ होण्यास मदत होते.

ज्वारीचे फायदे -
1) ज्वारीत असणाऱ्या तंतुमय पदार्थांमुळे पोट साफ राहते.
2) ज्वारी पचनास सुलभ असल्यामुळे आजारी व्यक्तीस दूध भाकरी फायदेशीर ठरते.
3) ज्वारीमुळे पोटाचे विकार कमी होतात.
4) रक्तवाहिन्यांतील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी ज्वारी उपयुक्त आहे.
5) हृदयासंबंधित आजारात ज्वारी अतिशय उपयोगी आहे.
6) शरीरातील इन्शुलिनची उत्पादकता कायम, योग्य प्रमाणात व कार्यक्षम ठेवण्यास मधुमेह असणाऱ्यास, तसेच इतरांनाही ज्वारीचा वापर उपयुक्त ठरतो.
7) शरीरातील अतिरिक्त चरबी, वजन कमी करण्यासाठी, कातडीचे आजार, जठरातील आम्लता कमी करण्यास उपयोगी.
8) महिलांच्या गर्भाशयाचे आजार, प्रजोत्पादन संस्थेचे विकार असणाऱ्यांना ज्वारी उपयोगाची आहे.
9) ज्वारीत काही घटक कर्करोगावर नियंत्रण आणतात.
10) शौचास साफ होणे, कावीळ रुग्णास उपयोगी आहे.

ज्वारीच्या पिठाची भाकर, थालीपीठ, धपाटे, उपमा, खानदेशात कळण्याच्या (ज्वारी व उडीद एकत्र दळून केलेले पीठ) पिठाची भाकरी, ज्वारीचे पापड, बिबडे, पाने, लाह्या, लाह्यांच्या जाडसर पिठाचे गोड पदार्थ, ज्वारी पीठ आंबवून केलेले धिरडे असे अनेक पारंपरिक पदार्थ आवर्जून आवडीने तयार केले जातात.

ज्वारीपासून रवा, लाह्या, पीठ, मिश्रधान्य पीठ, कळणा पीठ, हुरडा, पोहे, पास्ता, पापड, केक, बिस्कीट, कुकीज, ब्रेड, बन, बाल आहार, सिरप व साखर (गोड ज्वारीपासून) भरडा, मोड आणून बनविलेले पीठ (मालट फ्लोअर) हे पदार्थ तयार करता येतात. ज्वारीमधील पोषकद्रव्ये पाहता ज्वारीचा आहारात उपयोग केल्यास आहारातील पोषकमूल्यांचे संतुलन योग्य ठेवण्यास मदत होते. ज्वारीचे पीठ, रवा, शेवया, पास्ता, बेकरीचे पदार्थ, पोहे, लाह्या तयार करण्याचे तंत्र कृषी विद्यापीठ, अन्न तंत्र विभाग, प्रक्रिया विभाग, संशोधन केंद्रांनी विकसित केले आहे.

No comments:

Post a Comment