Monday, 21 November 2022

*साडेसाती निवारण्यासाठी*

 *साडेसाती निवारण्यासाठी*

साडेसाती म्हटली की डोळ्यासमोर शनी ग्रह येतो आणि एक तऱ्हेची भीती वाटत असते परंतु तशी ती मुळीच असू नये.

शनी हा असा एकच ग्रह आहे की ज्याला कसलीही आसक्ती नाही त्याच्या ठिकाणी संपूर्ण वैराग्य आहे.विजय मिळवला आहे माया चंद्राच्या अमलाखाली येते व शनीला मायेचा तिटकारा आहे.म्हणूनच मायेचे फसवे मायाजाल तोडण्यासाठी चंद्राला साडेसाती लागते. प्रपंचातील कटू अनुभव व्यक्ती घेते.,हळूहळू जीवत्म्या भोवतालचे मायेचे कोश,आवरण सुटते व जीवाला शिवाचे परम मंगल स्वरूप दिसून तो मुक्त होतो.अशारीतीने आम्हाला सोडवण्यासाठी त्याला थोडे कठोर व्हावे लागते .म्हणून त्याला घाबरायचे की त्याचे उच्च ध्येय समजून घेऊन त्याची भक्ती करायची! असह्य दुःख होते तेव्हाच ऐहिक आसक्तीची समाप्ती होऊन अध्यात्मिक प्रगतीची सुरुवात होते. *असह्य दारुण दुःख परमेश्वराच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारे एकमेव प्रभावी शस्त्र आहे.* किंबहुना वैराग्याची वृध्दी करण्यासाठी सर्व इंद्रिये भोग आसक्तीचे विषय शनी महाराज हिरावून घेतात.आमच्या हितासाठी केवळ आमच्या अध्यात्मिक प्रगतीसाठी आम्हाला मोक्षप्रत नेण्यासाठी हे करताना त्रास होणारच पण ती परमार्थाची उमेदवारी समजावी.

कोणत्याही गोष्टीची अंतिम स्थिती म्हणजे मृत्यु तारा ही शनी दर्शविते.म्हणून अशा नाशवंत मृत्यू लोकातून सुटका करून घेणे हे जीवाचे कसे श्रेष्ठ कर्तव्य आहे ,या सर्वांचे मार्गदर्शन शनी मुळे होते.

शनी कर्तव्य कठोर असला तरी नम्र, भक्तावर प्रेम करणारा ,कनवाळू ग्रह आहे.त्याला खोटी स्तुती,अहंकार आवडत नाही.

गर्विष्ठ पणाला शनी जास्त प्रायश्चित देतो .म्हणून साडेसाती ही खऱ्या अर्थाने मानवाला अध्यात्मिक दृष्टीने पुढे नेणारी आहे.जिथे गर्व,अहंकार,ढोंगीपणा, माया,विलास गळून पडतात .


*साडेसाती वर उपाय (सेवा)*


🌸 *शुद्ध आचरण,निष्काम सेवा*


🌸 *साडेसातीत मारुतीची सेवा ही सर्वश्रेष्ठ सेवा आहे. कारण शनीला मारुतीचा जाब असतो*


🌸 *मारुती स्तोत्र वाचन , पठण,हनुमान चालीसा रोज एकदा वाचणे.*


🌸 *हनुमान बीसा,पंचमुखी हनुमान कवच.*

ही सेवा स्त्री पुरुष,विद्यार्थी यांना लाभदायक आहे. *परंतु कुमारिका व विवाह इच्छुक मुलींनी मारुतीची सेवा न करता त्या ऐवजी रामरक्षा पठण करावी.*


🌸 *संसारी माणसाने चुकून सुध्दा शनियंत्र ,फोटो जवळ ठेऊ नये. कारण शनी हा ब्रम्हचारी ग्रह आहे.*


🌸 *दर शनिवारी मारुतीच्या मंदिरातील दिव्यात तेल वाहणे*


🌸 *शनीला खोटेपणा आवडत नाही.म्हणून भाव नसताना शनिवार उपवास करणे,नीलमनी धारण करणे वा शनी महात्म्य वाचणे म्हणजे विपरीत ओढवून घेणे.कारण शनीला खोटेपणा आवडत नसून शुद्ध,नम्र, साधी सेवा, सरळ भाव आवडतो.म्हणून शहाण्याने यापासून दूरच राहावे*


         ज्याची जन्म राशी वा लग्न मकर किंवा कुंभ,किंवा तूळ आहे, त्याला शनीची स्व राशी आणि उच्च रास असल्यामुळे साडेसातीचा फारसा त्रास होत नाही


*आणि सर्वात शेवटी ज्याला गुरूंचे श्री स्वामी समर्थ महाराजांचे पाठबळ असते...त्याला हा त्रास खूप कमी होतो*..... *🌷संदर्भ... श्रीपाद वल्लभ चरित्र*🌷


🙏 *श्री स्वामी समर्थ*🙏


*🌷ज्ञानदान भाग 4*🌷.....

*🌷🦚देवघर लाकडाचेच का असावे*🌷🦚

 *🌷🦚देवघर लाकडाचेच का असावे*🌷🦚

*🙏 श्री स्वामी समर्थ🙏*


वास्तूशास्त्र नुसार देवघर आपण ईशान्यला ठेवत असतो. मार्बल किंवा त्याप्रकारतले देवघर जड असतात . त्यामुळे ईशान्य दिशेला जडत्व प्राप्त होते.

दुसरे कारण असे की...लाकडाचा गुणधर्म करंट बाहेर जाऊ न देणे...जेव्हा आपण आपल्या देवघरासमोर बसून सेवा करत असतो....स्तोत्र ,मंत्र, इ. ..तेव्हा तिथे एक प्रकारची पॉझीटिव्ह एनर्जी तयार होत असते....ही एनर्जी किंवा ऊर्जा आपल्या देवांच्या मूर्तीत आपल्याला दिसते .देव प्रसन्न दिसतात.....ती एनर्जी तिथेच म्हणजे देवघरात राहू देण्याचे काम लाकडी देवघर करते. म्हणून देवघर हे नेहमी लाकडाचेच असावे.


*श्री स्वामी समर्थ*🌷

*मनाची स्वच्छता*

लुईस या एक अमेरिकन महिला होत्या. त्यांच्या पूर्वायुष्यात वयाच्या  5-15  वर्षांपर्यंत त्यांच्यावर भरपूर शारीरिक अत्याचार झाले. बलात्कार झाले. त्यामुळे त्यांचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोनच इतका नकारात्मक होता की हे संपर्ण जगच वाईट आहे. सर्व पुरुष हे घाणेरडेच आसतात व मी जगायला लायक नाही. ख्रिश्चॅनिटीनुसार त्या ‘नन’ झाल्या व त्यांच्या धर्मातील आध्यात्मिक पुस्तके वाचली. पुढे वयाच्या 40 व्या वर्षी त्यांना कॅन्सर होतो. जेव्हा त्यांच्या हे लक्षात यें की ज्यांनी हे कृत्य करायचं ते करून निघूनही गेले; त्यांच्या आयुष्यात काहीच फरक पडलेला नाही. त्रास (कॅन्सर) कोणाला झालाय तर मला. कारण इतकी वर्षं त्या सर्वांबद्दलच्या सर्व नकारात्मक भावना (राग, द्वेष, घृणा) मी धरून ठेवल्या आहेत. जर मला यातून बाहेर पडायचे असेल तर त्या सर्वांना माफ करणे खूप गरजेचे आहे. बरं ज्यांनी ते कृत्य केलं, ते माफ करण्यासारखं होतं का? तर आपल्या दृष्टीने नक्कीच नाही. पण ‘लुईस हे’ यांनी मनाची स्वच्छता केली. त्या सर्व व्यक्तींविषयी मनात असलेला सर्व राग बाहेर काढून त्या सर्वांना मनापासून माफ केले व कोणतेही ऑपरेशन (शस्त्रक्रिया) न करता त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या. पुढे 90 व्या वर्षापर्यंत जगभर लेक्चर देत फिरत होत्या.

त्यांनी एक सुंदर पुस्तक लिहिले आहे - ‘यू कॅन हील युवर लाईफ’. त्या पुस्तकाच्या शेवटच्या काही पृष्ठांमध्ये तर त्यांनी एक तक्ता दिला आहे, ज्यामध्ये पहिल्या स्तंभामध्ये आजार, दुसऱ्या स्तंभामध्ये त्यामागील नकारात्मक भावना व तिसèया स्तंभामध्ये कशाप्रकारे सकारात्मक विचार करा म्हणजे तो आजार बरा होईल असे दिले आहे. अगदी सर्दी खोकल्यापासून कॅन्सरपर्यंत सर्व आजारांच्या मागच्या नकारात्मक भावनांचा त्यामध्ये समावेश आहे. हा तक्ता आपल्या मनाची स्वच्छता करायला नक्कीच मार्गदर्शक ठरेल.

दुसरे उदाहरण ‘ब्रँडन बेज’ यांचे. त्यांना स्वत:ला फुटबॉलच्या आकाराचा ट्युमर पोटामध्ये होता. बऱ्याच दिवसांपासून पोट सुटल्यासारखं वाटतंय म्हणून रूटिन चेकअपसाठी सोनोग्राफी केली, तेव्हा एवढा मोठा ट्युमर डॉक्टरांना दिसला. त्यांच्या गायनॅकॉलाजिस्ट (स्त्री रोग तज्ज्ञ) तर उडाल्याच. त्या म्हणाल्या, लगेच अ‍ॅडमिट होऊन उद्याच्या उद्या ऑपरेशन करून काढून टाकू. पण ब्रँडन बेज यांना मन, भावना व शरीराच्या संबंधांविषयी चांगली माहिती असल्याने त्या म्हणाल्या, मला एक महिन्याची मुदत द्या. समजा काही उपयोग नाही झाला तर ऑपरेशन करा. एक महिनाभर त्यांनी स्वत:च्या मनाची स्वच्छता केली व जुन्या अनावश्यक आठवणी खणून बाहेर काढल्या व टाकून दिल्या. त्याच्याशी निगडित लोकांना माफ केलं. महिनाभराने सोनोग्राफीत ट्युमरचा आकार निम्म्याने कमी झाला व पुढील तीन महिन्यांत सोनोग्राफी नॉर्मल आली. इतरांनाही याचा उपयोग व्हावा यासाठी त्यांनी 'The Journey' या नावाचे पुस्तक लिहिले आहे. तसेच ही पद्धत शिकवणारा तीन दिवसांचा कोर्सही सुरू केला आहे. त्या कोर्सचा मला वैयक्तिक खूपच उपयोग झाला.

तसेच आपल्या देशातील डॉ. दीपक चोप्रा हे एक प्रख्यात एन्डोक्रायनॉलॉजिस्ट आहेत व अमेरिकेतील एका प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये प्रमुख पदावर होते. ते म्हणायचे की मी अगदी मनापासून कॅन्सरच्या गाठी मुळापासून कापतो - So ideally it should not recur.  खरं म्हणजे ते पुन्हा होता कामा नये. पण तरीही recurrence का बरं होतो? जेव्हा त्यांनी याचा शोध घ्यायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या हे लक्षात आले की जेव्हा आपल्याला एखादी जखम होते, तेव्हा मलम लावलं तर ती जखम लवकर बरी होते. पण समजा नाही लावलं तरीही ती जखम बरी होतेच. कोण बरं ही जखम बरी करतं? आपलंच शरीर!

जखमेच्या शेजारील mother cells पासून daughter cells तयार होतात व जखम भरून येते. सर्वसाधारणपणे आईचे जसे संस्कार/मानसिकता असेल तशीच मुलीची होते. आपल्या नकारात्मक भावना वेगवेगळ्या पेशींमध्ये साठवल्या जातात. त्यामुळे ट्युमर कापला तरी तिथे जी जखम होते, ती बरी करण्याचं काम तिथल्या mother cells करतात. पण त्यामध्ये जर नकारात्मक भावना साठवल्या असतील तर नवीन पेशी परत तशाच तयार होणार. त्यामुळे वर-वर फांद्या छाटून उपयोग नाही तर झाड मुळापासून काढायला हवं. हे जेव्हा त्यांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी medical practice बंद केली व आता ते पूर्णपणे cellular healing वर काम करतात. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला मनाची स्वच्छता करायला शिकवतात.

त्यामुळे जर आपण सर्वांनी स्वत:साठी रोजची 15 मिनिटे काढली व मनाची स्वच्छता केली तर आपण कमीत कमी आजारी पडू. बरं मनाची स्वच्छता करताना एखाद्या दिवशी खूपच छान व हलके वाटते पण दुसऱ्या दिवशी परत काहीतर घटना घडतात आणि ‘ये रे माझ्या मागल्या’प्रमाणे मनात नकारात्मक विचार यायला लागतात. दारुड्या माणसाला तुम्ही कितीही समजवा की दारू पिणे वाईट आहे व त्याला ते पटतेसुद्धा. पण दारूचे दुकान दिसल्यावर पाय बरोबर तिकडे वळतात. त्याचप्रमाणे आपण अगदी ठरवतो सुद्धा की फक्त सकारात्मकच विचार करायचे. पण एक ठिणगी पुरेशी होते की लगेच नकारात्मक विचारांची शृंखला सुरू होते. पण हे अगदी नैसर्गिक आहे. ज्याप्रमाणे घरातील धूळ रोज साफ करावी लागते, त्याचप्रमाणे मनाची स्वच्छताही रोज करणे आवश्यक आहे.

प्रयोग म्हणून करून तर पहा. मी जोपर्यंत स्वत: कोणती गोष्ट करून अनुभवून पहात नाही तोपर्यंत त्यावर विश्वास ठेवत नाही. तुम्हीही ठेवू नका. पण एकदा तुम्हाला अनुभव आला की मला खात्री आहे की रोज ज्याप्रमाणे आपण सकाळी उठल्यावर व रात्री झोपताना दास घासायला, अंघोळ करायला/हातपाय धुवायला विसरत नाही, त्याप्रमाणे एकदा तुम्हाला मनाची स्वच्छता करण्याची सवय लागली की तुम्ही कधीच ही सवय सोडणार नाही.


परमात्मा

  *सगळे दरवाजे बंद झाले तरी एक दरवाजा कधीच बंद होत नाही . तो दरवाजा परमेश्वराचा असतो . विश्वास ठेवा परमेश्वर दुसरा दरवाजा उघडल्या शिवाय पहिला दरवाजा बंद करत नाही* 

  *परमात्मा हा आँक्सिजन सारखा आहे . त्याला आपण बघू नाही शकत पण त्याच्या शिवाय आपण जगू पण नाही शकत . चूक तेव्हाच होते जेव्हा आपण परमात्म्याला विसरण्याची चूक करतो . स्वतःला शिक्षित समजून परमेश्वराला विसरण्याची चूक कधी करू नका . कारण काळ कर्म बघतो डिग्री नाही*. *परमात्मा सगळ्यांना एकाच मातीने बनवित असतो . फरक फक्त एवढाच असतो की कोणी बाहेरून सुंदर असतो तर कोणी आतून . परमात्मा चित्रात नाही तर चरित्रात असतो म्हणून स्वतःचा आत्मा पवित्र बनवा . कर्म असे करा की परमेश्वराशी नजर मिळवताना " लाज " नाही वाटली पाहिजे . कारण एक तोच आहे जो तुमचे सर्व राज जाणतो* .

 ... अनामिक.

Tuesday, 19 July 2022

*! ! ऋणानुबंध!!*

 *! ! ऋणानुबंध!!*

*ऋण फेडता आले पाहिजे.*

*वनवासाच्या काळात माता सीतेला तहान लागली,*

*तेव्हा श्रीरामाने सर्वत्र बघितले,*

*पण पाणी कोठेच मिळेना.*

*सर्वत्र जंगलच दिसत होते.*

*तेव्हा श्रीरामाने पृथ्वीमातेला प्रार्थना केली की,*

*जेथे कोठे पाणी असेल,*

*तेथे जाण्याचा मार्ग आम्हांला दाखव.*

*तेव्हा एक मयुर 🦚तेथे आला,*

*व श्रीरामास म्हणाला,*

*येथून थोड्याशा अंतरावर एक जलाशय आहे.*

*चला मी आपणास दाखवतो.*

*पण तिथे मी उडत उडत जाईन,*

*आणि आपण चालत येणार,*

*त्यामुळे चुकामूक होऊ शकते.*

*म्हणून मी मार्गात एक एक पंख टाकत जाईन.*

*त्यामुळे आपणास मार्ग सापडेल,*

*व आपण जलाशया जवळ पोहचाल.*

*आपणास माहिती आहे की,*

*मयूर पंख, हॆ एक विशेष काळी,*

*व एक विशेष ऋतुमध्ये* *पंख तुटून पडतात.*

*पण मोराच्या इच्छेविरूद्ध पंख निघत असतील,*

*तर त्याचा मृत्यु होतो.* 

*आणि तेच झाले.*

*त्याचे पंख निघत होते,*

*त्यामुळे त्याचा मृत्यूचा काळ जवळ आला होता.*

*तेव्हा मोर म्हणाला की,*

*मी किती भाग्यशाली आहे की,*

*जो जगाची तहान भागवतो,*

*त्या प्रभूची तहान भागवण्याचे मला सौभाग्य प्राप्त झाले.*

*माझे जीवन धन्य* *झाले. आता मरताना माझी काही इच्छा शेष राहीली नाही.*

*तेव्हा मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाने मयुरास म्हटले की,*

*माझ्या साठी जे मयूरपंख इच्छेविरूद्ध काढून,*

*मार्गात टाकलेस, त्यामुळे तुझे माझ्यावर ऋण झाले आहे,*

*व जो ऋणानुबंध झाला आहे,*

*हे ऋण मी पुढच्या अवतारात, नक्की फेडीन.*

*माझ्या कृष्ण अवतारात तुला,*

*माझ्या माथ्यावर धारण करीन.*

*त्यानुसार पुढच्या अवतारात,*

*श्रीकृष्ण अवतारात त्यांनी आपल्या माथ्यावर मयूरपंख धारण करुन,*

*वचना नुसार मयुराचे ऋण उतरवले.*

*तात्पर्य हे आहे की,*

*जर प्रत्यक्ष भगवंतास मागील जन्मातले,*

*ऋण पुढील जन्मात फेडावे लागले,*

*मग आपण तर मनुष्य आहोत.*

*न जाणो आपणास कितीतरी ऋण फेडायचे आहे.*

*आपण तर अनेक ऋणानुबंधनात अडकलेलो आहोत.*

*ते ऋण फेडण्यासाठी,*

*कित्येक जन्म कमी पडतील.*

*अर्थात,आपणास जे काही भले करायचे आहे,*

*ते या जन्मात करायचे आहे.*

*कारण पुढचा जन्म कुठला असेल,*

*आपणास माहिती नाही,*

*आणि मनुष्य जन्मातच ऋण फेडता येते.*

*एक महत्त्वाचे-*

*पूर्वीचा ऋणानुबंध असल्याशिवाय,*

*माशी सुध्दा अंगावर बसत नाही.*

*त्यामुळे मागच्या जन्मातील देणेकरी, वैरी, ज्यांना त्रास दिला गेला,*

*हे आपल्या या जन्मी भाऊ, बहीण,नातेवाईक, शेजारी,*

*या रुपात आपापले ऋण वसूल करतात,*

*व ज्यांना आपण मदत केली,*

*तेही या जन्मी कोणत्या ना,*

*कोणत्या रुपात येवून,*

*परतफेड करतात.*

*त्यामुळे मी सरळमार्गी आहे,*

*मी कोणालाही त्रास दिला नाही,*

*मग माझ्याबाबतीत असे का होते,*

*याची कधीच खंत करु नका,*

*समर्थ रामदास स्वामी म्हणतात,*

*मना त्वाची रे पूर्वसंचित केले.!*

*तयासारिखे भोगणे प्राप्त झाले.!!*

*देह प्रारब्धावर सोडून,*

*मन सद्गुरुचरणी,*

*व वाणी नामस्मरणात गुंतविल्यास,*

*जीवनातील गंमत,*

*व आनंद अनुभवता येतो...!!*

*जय श्रीकृष्ण!🙏*

Monday, 27 September 2021

*🌹 कर्माचा - सिद्धांत 🌹*

*🌹 कर्माचा - सिद्धांत 🌹*

*कोणाचीही हाय लागून घेऊ नये, त्याचे भयंकर परिणाम भोगावे लागतात.*
काही लोकांना नाही पटणार हा विषय, 
पण ज्यांनी  अनेकांचा तळतळाट घेतलाय आणी त्याचे भोग ते भोगत असतात, त्यांना नक्कीच पटेल, ....
अनेक कारणांनी तळतळाट दिलेला असतो, ...
जसे की  
1) शारिरीक, मानसिक, आर्थिक,...
2) अपमानास्पद वागणुक,...
3) *कोणांचे मन दुखावले असू * शकते,...                     
4) कोणावर अन्याय केला गेलेला असतो,...
5) कोणाची काही कारण नसताना सामाजिक बदनामी केलेली असते,.....
6) *छळ केलेला असेल,.....*
7) कोणाची हक्काची फसवून प्रॉपर्टी हडपली असेल.....
8) कोणाला अनिती करायला बळ दिल असेल......
9) शारिरीक दुखापत केलेली असेल, .......
10)  विश्वासात गैरफायदा घेतला गेलेला असेल......                                       
11) ज्याने उपकार केले असतील आणि स्वार्थासाठी त्याच्याच पाठीत खंजीर खुपसला असेल.....

त्रासाचे कुठलेही कारण असो...
वरील गोष्टींचा समोरच्या व्यक्तीला प्रचंड त्रास होत असतो, तो खुप दुःखी  होतो, त्याचे मनोबल कमकुवत होत असते,  पर्यायाने ती व्यक्ती प्रचंड डिप्रेशनमध्ये देखील जाऊ शकते , 
जाणुन-बुजून त्रास देणाऱ्या व्यक्तीला हे समजत नसेल, 
 पर्यायाने ज्या व्यक्तीला त्रास झालेला असतो त्या व्यक्तीकडुन चमत्कार होत नाही, किंवा  देवदेखील शाप देत नाही किव्हा काठीने मारत नाही , *पण त्या दुखावलेल्या व्यक्तीकडुन  अतिशय तेजस्वी नकारात्मक उर्जा शक्ती निघते व समोरच्या व्यक्तीमध्ये शोषली जाते,  मग समोरच्या व्यक्तीला हाय लागते त्यालाच तळतळाट अस म्हटले जाते.*
मग ज्याने कोणी त्रास दिलेला असतो, त्याचे हे कार्य यशस्वी होत नाही, किंबहुना झाले तरी फार काळ टिकत नाही,  सतत अपयश येणे,  घरात आजारपण येणे, काहीही घटना घडू शकतात,....
*आपण किती खरे आहोत व किती खोटारडे आहोत* हे फक्त आपल्याला व 
*आपल्या अंतर्मनालाच माहीत असते.*
समोरच्याचे मन दुखावले जाणे म्हणजेच पाप लागणे. त्याची परतफेड याच जन्मात करावी लागते, 
*तुम्ही आस्तिक असा किंवा नास्तिक,*
 चांगल्या-वाईट गोष्टींचा हिशोब सव्याज परत करावाच लागतो,
मी  एका पुस्तकात वाचले होते,
राजा धृतराष्ट्राचे शंभरच्या-शंभर पुत्र युध्दात मारले गेले,

*तेव्हा त्याने श्रीकृष्णाला विचारले की अस का व्हावे?*

 माझ्या संबंध जीवनात मी असे कोणतेही महान पातक केलेलं नाही,
की ज्याच्या परिणामस्वरूप सर्वच्या-सर्वच पुत्रांचा मृत्यु  आपल्या डोळ्यांसमोर पाहून त्याचे दुःख सोसणे माझ्या नशिबी  यावे? 
तेव्हा भगवान श्रीकृष्णाने धृतराष्ट्र राजाला आपले पुर्व-जन्म पहाण्याची दिव्य-दृष्टि दिली.
धृतराष्ट्र राजाने दिव्य-दृष्टिद्वारे पाहीले की साधारण पन्नास जन्मापुर्वी  तो एक पारधी होता, आणि पक्षी पकडण्यासाठी त्याने एका वृक्षाला आग लावली होती. आग लागताच बरेचसे पक्षी उडून गेले. मात्र आगीची झळ लागल्याने त्यातील कित्येक पक्षी आंधळे झाले तर पक्षांची शंभरएक लहान पिल्ले  उडू न शकल्याने आगित होरपळून मृत्युमुखी पडली.             धृतराष्ट्र राजाची *त्यावेळची ती क्रिया होती त्याच्या कर्माचे फळ कित्येक जन्मानंतर धृतराष्ट्र राजाचे शंभर पुत्र युध्दात मारले गेले तेव्हाच ते पुर्ण झाले.*

*कर्म हे फळ देऊनच शांत होते.*
प्रत्येक चांगल्या-वाईट गोष्टींचा हिशोब हा होतोच, 
हा प्रत्येकाच्या कर्माचा सिध्दांतच आहे, 
चांगले कर्म,चांगले फळ देऊनच शांत होते. वाईट कर्म, वाईट फळ देऊनच शांत होते. फक्त वेळ आणि काळ  मागे-पुढे होऊ शकते.
हाच कर्माचा सिध्दांत आहे.
आता आपणच ठरवायचे आहे,आपले कर्म कसे हवे.
*"जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर॥ 🚩*

*क्षणीक सुखासाठी अपुल्या, कुणी होतो नितीभ्रष्ट".🚩🙏😌🙏*

Monday, 26 July 2021

*शनीची मूर्ती काळी कां असते?*

*शनीची मूर्ती काळी कां असते?*

*स्मशानात चितेवर महर्षी दधीचिंच्या अस्थिविहीन कलेवरावर दाह संस्कार होत होता आणि तिकडे त्यांच्या आश्रमात त्यांची भार्या* *पतिवियोगानं वेडीपिशी झाली होती. दुःखावेग सहन न झाल्यानं शेवटी तिनं आपल्या आश्रमातील पिंपळाच्या झाडातील ढोलीत आपल्या तीन वर्षांच्या चिमुरड्याला ठेवून दिलं आणि ती पतीच्या चितेवर बसून सती गेली. अशा प्रकारे महर्षी दधिची* *यांच्यासोबतच त्यांच्या पत्नीनंही देवांच्या लढाईत आपलं बलिदान दिलं. इकडे पिंपळाच्या झाडाच्या ढोलीत ठेवलेल्या त्या बाळानं तहान भुकेसाठी आकांत मांडला.* *खायला कांहीच न दिसल्यानं त्यानं ढोलीत पडलेल्या पिंपळाची फळं खाल्ली. त्या दिवसापासून पिंपळ वृक्षाची फळं आणि पानं हाच त्याचा आहार झाला.* *झाडाची ढोली हेच त्याचं घर झालं. हळू हळू ते बालक मोठं होऊ लागलं. झाडाच्या ढोलीत त्याला सुरक्षित वाटू लागलं.*
*एके दिवशी देवर्षी नारद तिथून जात असता त्यांना* *पिंपळवृक्षाच्या ढोलीमध्ये एक लहान मुलगा दिसून आला.* *नारदाला आश्चर्य वाटले. त्यांनी त्या लहान मुलाला प्रश्न विचारून त्याचेकडून त्याच्याबद्दलची माहिती काढून घेतली -*
*नारद- हे बालका, तू कोण आहेस?*
*बालक- मलाही ते माहित नाही. मला तेच जाणून घ्यायचं आहे.*
*नारद- तुझे आईवडील कोण आहेत?*
*बालक- मला तेही माहित नाही*. *मलाही तेच जाणून घ्यायचं आहे*
*तेव्हा नारदानं ध्यान लावलं आणि नारदाला जे कळलं त्यामुळे नारदांना महदाश्चर्य वाटलं. ते म्हणाले, "हे बालका, तू महादानी अशा महर्षी दधिचीचा पुत्र आहेस. तुझ्या पित्याच्या अस्थींच्या साहाय्यानंच देवांनी वज्र नामक अस्त्र तयार केलं आणि त्या अस्त्राच्या* *साह्येकरूनच देवांना असुरांवर विजय मिळविणं शक्य झालं. तुझ्या पित्याचा मृत्यू झाला तेव्हा त्यांचं वय अवघं एकतीस वर्षांचं होतं.*
*बालक- माझ्या पित्याच्या अकाल मृत्युचं कारण काय होतं ?*
*नारद- तुझ्या पित्याची शनीची महादशा सुरु होती.*
*बालक- माझ्यावर हे असं भयानक संकट यायचं कारण काय असावं?*
*नारद- शनिदेवाची महादशा.*
*एव्हढं सांगून नारदानं पिंपळ वृक्षाची पानं आणि फळं खाऊन जगणाऱ्या त्या बालकाचं पिप्पलाद असं नामकरण केलं आणि त्याला ज्ञानाची दीक्षा दिली.*
*नारद निघून गेल्यानंतर बालक पिप्पलादनं नारदानं सांगितल्याप्रमाणे ब्रह्मदेवाची घोर तपश्चर्या करून त्यांना प्रसन्न करून घेतलं.ब्रह्मदेवानं पिप्पलादाला वर मागायला सांगितलं तेव्हा पिप्पलादनं 'मी ज्याच्याकडे पाहीन ते त्याच क्षणी भस्म होऊन जावं' असा वर मागितला. ब्रह्मादेवानं "तथास्तु" म्हणून पिप्पलादाला तसा वर दिला. हा वर मिळाल्याबरोबर पिप्पलादनं सर्वप्रथम शनिदेवांना आवाहन केलं. त्याबरोबर शनिदेव प्रगट झाले. शनिदेव समोर येताच पिप्पलादनं आपली नजर त्यांच्यावर रोखली. त्याबरोबर शनीच्या अंगाचा प्रचंड दाह होऊन त्यांचं शरीर जळू लागलं. हे पाहून समस्त ब्रह्माण्ड हादरलं. सूर्यपुत्र असलेल्या शनिदेवांना वाचवणं ब्रह्मदेवांनी पिप्पलादाला दिलेल्या वरामुळे देवांना अशक्य झालं. प्रत्यक्ष सूर्यदेवही आपल्या मुलाचं शरीर आपल्या नजरेसमोर जळताना पाहून ब्रह्मदेवाला त्याच्या प्राणांची भीक मागू लागले. शेवटी स्वयं ब्रह्म्यानं पिप्पलादाला त्यानं शनिदेवांना सोडून द्यावं अशी विनंती केली. पण पिप्पलादनं ती विनंती धुडकावून लावली. शेवटी ब्रह्मदेवानं पिप्पलादाला एका ऐवजी दोन वरदान देण्याचं कबूल केलं. मग मात्र पिप्पलादाला आनंद झाला आणि त्यानं ब्रह्मदेवाची विनंती मान्य केली. पिप्पलादनं ब्रह्मदेवाला दोन वर मागितले -*
*1- जन्मानंतर पहिली पाच वर्षे कुठल्याही बालकाच्या कुंडलीत शनीला स्थान असणार नाही ज्यामुळे यापुढे कोणताही बालक माझ्यासारखा अनाथ होणार नाही.*
*2- माझ्यासारख्य अनाथाला पिंपळ वृक्षानं आश्रय दिला आहे. म्हणून जी व्यक्ती सूर्योदयापूर्वी पिंपळ वृक्षाला जलार्पण करील त्या व्यक्तीवर शनीच्या महादशेचा कुठलाही प्रभाव पडणार नाही.*
*"तथास्तु" म्हणत ब्रह्मदेव तिथून गुप्त झाले. तेव्हा पिप्पलादनं आगीत जळणाऱ्या शनिदेवाच्या पायांवर आपल्या ब्रह्मदंडानं आघात करून त्यांना शापामुक केलं. ब्रह्मदंडाच्या आघातानं शनीचे पाय अधू झाले आणि त्यामुळे त्यांना पाहिल्यासारखं चालता येईना. म्हणून* *तेव्हापासूनच शनि "शनै:चरति य: शनैश्चर:" अर्थात जो हळू हळू चालतो त्याला शनैश्वर म्हटल्या जाते. आणि आगीमध्ये अंग भाजल्यानं शनीची काया काळी ठिक्कर पडली. .*
*शनीची मूर्ती काळी कां आहे आणि पिंपळ वृक्षाची पूजा कां केली जाते याचं रहस्य वरील कथेत दडलेलं आहे. पुढे पिप्पलादनं प्रश्नोपनिषदाची रचना केली. आजही हे उपनिषद ज्ञानाचं कधीही न संपणारं भांडार म्हणवल्या जातं.*