Tuesday 2 April 2019

नियती आपली रोज परिक्षा घेते...

सध्याचं युग हे माहिती व तंत्रज्ञानाचं युग आहे. आज प्रगत तंत्रज्ञानामुळे जगात घडणारी कोणतीही गोष्ट आपल्या जवळ क्षणात पोहोचते. ही गोष्ट चांगली व आपल्या फायद्याची असली तरी तिचे अनेक तोटेही आहेत. याच तंत्रज्ञानामुळे संध्याचं जग फास्टही झाले आहे. आधी घड्याळ एकाद्याकडेच असायचे पण वेळ मात्र सगळ्यांकडे असायचा. आज घड्याळ सगळ्यांकडे आहे, मात्र वेळ कुणाकडेच नाही. जो तो फक्त आपापल्या प्रपंचात इतका व्यस्त आहे, की इतरांसाठी सोडा स्वत:साठीही व्यक्तीकडे आज पुरेसा वेळ नाही.
या सगळ्यांचा परिणाम म्हणजे आपले धैर्य, संयम सुटत चालला आहे. आज सर्वजण फार उतावीळ झाले आहेत. घटना काय घडली आहे, याच्या पूर्ण तपशिलात न जाता, त्यावर चिंतन न करता आज सर्वजण फक्त ब्रेकिंग न्यूज बघुन उतावीळ होतात. याच्या खूप सा-या परिणामांपैकी एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे कष्ट करण्याची, सहन करण्याची अंगी क्षमता, गुण असूनही आपली मानसिकता नसते. त्यामुळे भलतंच काही होऊन बसतं. हा बदल आपल्यात झालेला आहे. प्रकृती किंवा नियतीमध्ये हा बदल झालेला नाही. नियती तिचं काम बरोबर करते. नियती आपली रोज परिक्षा घेत असते. आपण मात्र त्या परिक्षेचा बाऊ करुन घेतो.
अशीच एक घटना घडली. अत्यंत साधी, स्वाभावीक व प्रत्येकाच्या आयुष्यात काही वेळेला घडतेच अशी घटना होती. परिचितांमधील एका महिलेचा मला फोन आला. म्हणाली, मला तुम्हाला भेटायचं आहे.
म्हटलं ठिक आहे, उद्या येऊन जा भेटायला. कारण त्या दिवशी मला बाहेर थोडं काम होतं व इतर वेळ मी दुस-यांना दिलेला होता.
ती म्हटली, नाही आजच तातडीने भेटायचं आहे. उद्या खूप उशिर होऊन जाईल. तोपर्यंत मी राहूच शकत नाही.
मी म्हटलं, का गं काय झालं एवढं? तर ती म्हटली, ते भेटल्यावरच सविस्तर सांगेल. पण मी खूप टेंशनमध्ये आहे. माझं चित्त लागत नाही आहे. त्यामुळे तातडीने तुम्हाला भेटून मला त्यावर उपाय पाहिजे.
मी म्हटलं, ठिक आहे. ये दुपारी भेटायला. ती दुपारी येणार असल्यामुळे मला बाहेरची जी कामे होती ती त्या दिवशी रद्द करावी, लागली.
ठरल्याप्रमाणे ती वेळेआधीच ऑफिसला आली. माझ्याकडे आधीच एक महिला बसलेली होती. त्यामुळे माझ्या कॅबिनच्या समोरच असलेल्या खुर्चीवर ती बसली. आता आपण वेळेच्या आधी आलेलो आहोत, तर थोडं शांततेन बसलं पाहिजे. माझ्या ऑफिस बॉयने तिला पाणी प्यायला दिलं. तिने पाणी घेतलं आणि त्याला म्हणाली, मॅडमांना सांग मी आलीय म्हणून. आता त्याला माहिती आहे, की ऑफिसमध्ये कोण येतंय आणि कोण जातंय हे काचेतून सगळं बघते. त्यामुळे त्याने तिला तिथेच सांगून टाकले, तुम्ही थोडं बसा .मॅडम बोलवतील तुम्हाला आतमध्ये!
बरं समस्या अशी की माझ्याकडे येणारा प्रत्येकजण समस्या घेऊन आलेला असतो. त्या विषयी गुप्तता पाळली जावी अशी त्याची इच्छा असते आणि ती मला पाळावीही लागते. कारण तसे केले नाही तर माझ्याकडे कोणी व्यक्तच होणार नाही. म्हणून मी तिला कॅबिनमध्ये बोलवू शकत नव्हते.
तिची चलबिचल मात्र मला काचेतून दिसत होती. पाच मिनिटे बसल्यानंतर ती सरळ उठून कॅबिनमध्ये आली. माझ्या समोर बसलेल्या महिलेला बघुन मात्र तिला थोडं अवघडल्यासारखं झालं. तरीही म्हणाली, स्वॉरी हं ताई मी सरळ आतमध्ये आले.
मी म्हटलं काही हरकत नाही. या बसा. तशी ती पटकन बसली. त्यामुळे ज्या महिला माझ्याकडे आधीपासून बसलेल्या होत्या त्यांना मी सांगितलं, की आपण उद्या ठरलेल्या वेळी भेटूया. असं बोलून मी त्यांना निरोप दिला.
त्या महिला कॅबिनच्या बाहेर गेल्याही नसतील, की हिने तिची व तिच्या नव-याची पत्रिका माझ्या पुढ्यात टाकल्या व म्हणाली ताई बघा हो, आमचे ग्रह असे अचानक कसे फिरले. काय चुक घडली आहे आमच्या हातून की असा प्रसंग आलाय.
काय झालंय? असं मी तिला विचारण्याची तिची अपेक्षा होती. मी मात्र त्या दोन्ही पत्रिकांचा अभ्यास करायला लागले. मी काही बोलत नाही म्हटल्यावर मग तिनेच बोलायला सुरुवात केली. तसं मी तिला थांबवलं. म्हटलं मला आधी पत्रिका बघु द्या.
दोघांच्याही पत्रिका अत्यंत उत्तम व राजयोग कारक होत्या. फक्त १८ महिन्यांचा कठिण कालखंड सुरु झालेला होता. तो संपल्यानंतरही सर्वकाही उत्तमच होतं. दोन्ही पत्रिका पूर्णपणे बघुन झाल्यानंतर मी तिला म्हणाले, बोला काय समस्या आहे तुमची.
नाईलाजाने संयम ठेवून शांत बसलेली ती महिला एकदम सुसाट बोलू लागली. अहो, ताई काय सांगू तुम्हाला, काल यांची नोकरी सुटली हो. संध्याकाळी घरी येऊन जेव्हा ह्यांनी ही गोष्ट मला सांगितली तेव्हापासून तर माझे चित्तच उडाले आहे. रात्री जेवण तर गेलेच नाही पण रात्रभर झोपही लागली नाही. नको नको ते विचार मनात सतत येत आहेत. आता कसं होणार आमचं. कृपा करुन मला यावर काही उपाय सांगा हो.
मी म्हटलं, अहो, एवढ्याशा गोष्टीने तुम्हाला एवढं घाबरायला का होतंय? नोकरी सुटली ही काही फार मोठी गोष्टी नाही. तुमचे पती शिकलेले आहेत, हुशार आहेत. एक नोकरी सोडली तर त्यांना दुसरी नोकरी मिळेलच ना! ते आता आयुष्यभर घरीच थोडे बसणार आहेत.
पण लगेच मिळेल का दुसरी नोकरी! तिचा लगेच प्रश्न. मी म्हटलं, हा काय ज्योतिषाला विचारायचा प्रश्न झाला का? आधी तुम्हाला तुमच्या नव-यावर विश्वास असायला हवा. त्यातही ही वेळ दुसरी नोकरी मिळेल की नाही यावर विचार करायची नक्कीच नाही. हा विचार तुमचे पती करीतच असतील. तुम्ही यावेळी त्यांच्यावर विश्वास दाखवायला हवा. त्यांना गरज नसली तरी धीर द्यायला हवा, की एक नोकरी सुटली म्हणून काय झालं? आता यानिमित्ताने मस्तपैकी काही दिवस घरी आराम करा. तेवढाच मला तुमच्यासोबत जास्त वेळ सोबत राहायला मिळेल. मग काही दिवसांनी दुसरी नोकरी आपण शोधुया.
हे करायचे सोडून तुम्ही जर असं घाबरायला लगलात तर त्यांनी काय करायचं? मग मी तिला समजावून सांगितले, की तुम्हा दोघांच्याही पत्रिका अगदी उत्तम आहेत. फक्त १८ महिन्यांचा कठिण कालखंड जो सुरु झालेला आहे. त्यामुळेच तुमच्या पतीची नोकरी सुटलेली आहे. येणारे १८ महिने तुम्हाला थोडा त्रास सहन करावाच लागणार आहे.
आयुष्य म्हटलं, की चढ-उतार आलेच. संघर्ष कोणालाही सुटलेला नाही. नियती तुमची परिक्षा पाहत आहे. त्या परिक्षेला तुम्हाला सामोरं जावंच लागेल आणि गृहिणी म्हणून, अर्धांगिनी म्हणून अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या नव-याच्या पाठिशी ठामपणे उभं राहावंच लागेल. बरं तुमची परिस्थितीही काही वाईट नाही. स्वत:चा फ्लॅट आहे, गाडी आहे. बँकेत काही बचत केलेले पैसे असतील. सासु-सास-यांची मदतही होईल. मग इतकी काळजी कसली करताय?
माझ्या मते मी त्या महिलेला पूर्णपणे समजावलेलं होतं. ती निघुन गेली. मात्र माझ्या डोक्यात वेगळेच विचार सुरु झालेत. लोक इतके नियतीच्या परिक्षेला सामोरे जाण्याच्या आधीच घाबरु कसे शकतात? पूर्वीच्या काळी स्त्रीयांमध्ये अत्यंत संयम व सहनशीलता होती. कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी यामुळे अन्नधान्याच्या टंचाईतही महिला १० ते १२ जणांचा परिवार कुठलीही तक्रार न करता अतिशय उत्तमरीत्या चालवित असत. आज परिवारांची विभागणी होऊनही, स्वतंत्र मनासारखं जगण्याची मुभा असूनही आपले धैर्य खचले आहे. म्हणूनच नियतीच्या परिक्षांना सामोरे जाण्याची आपल्याला भिती वाटत राहते, हेच खरे!

।। शुभम भवतू ।।

ज्योतिष भास्कर सौ ज्योती जोशी
"श्री " वैदिक आणि सायंटिफीक ज्योतिष संशोधन केंद्र , जळगाव मो .नं 9850098688 ( whatsup only )

No comments:

Post a Comment