*शनीची मूर्ती काळी कां असते?*
*स्मशानात चितेवर महर्षी दधीचिंच्या अस्थिविहीन कलेवरावर दाह संस्कार होत होता आणि तिकडे त्यांच्या आश्रमात त्यांची भार्या* *पतिवियोगानं वेडीपिशी झाली होती. दुःखावेग सहन न झाल्यानं शेवटी तिनं आपल्या आश्रमातील पिंपळाच्या झाडातील ढोलीत आपल्या तीन वर्षांच्या चिमुरड्याला ठेवून दिलं आणि ती पतीच्या चितेवर बसून सती गेली. अशा प्रकारे महर्षी दधिची* *यांच्यासोबतच त्यांच्या पत्नीनंही देवांच्या लढाईत आपलं बलिदान दिलं. इकडे पिंपळाच्या झाडाच्या ढोलीत ठेवलेल्या त्या बाळानं तहान भुकेसाठी आकांत मांडला.* *खायला कांहीच न दिसल्यानं त्यानं ढोलीत पडलेल्या पिंपळाची फळं खाल्ली. त्या दिवसापासून पिंपळ वृक्षाची फळं आणि पानं हाच त्याचा आहार झाला.* *झाडाची ढोली हेच त्याचं घर झालं. हळू हळू ते बालक मोठं होऊ लागलं. झाडाच्या ढोलीत त्याला सुरक्षित वाटू लागलं.*
*एके दिवशी देवर्षी नारद तिथून जात असता त्यांना* *पिंपळवृक्षाच्या ढोलीमध्ये एक लहान मुलगा दिसून आला.* *नारदाला आश्चर्य वाटले. त्यांनी त्या लहान मुलाला प्रश्न विचारून त्याचेकडून त्याच्याबद्दलची माहिती काढून घेतली -*
*नारद- हे बालका, तू कोण आहेस?*
*बालक- मलाही ते माहित नाही. मला तेच जाणून घ्यायचं आहे.*
*नारद- तुझे आईवडील कोण आहेत?*
*बालक- मला तेही माहित नाही*. *मलाही तेच जाणून घ्यायचं आहे*
*तेव्हा नारदानं ध्यान लावलं आणि नारदाला जे कळलं त्यामुळे नारदांना महदाश्चर्य वाटलं. ते म्हणाले, "हे बालका, तू महादानी अशा महर्षी दधिचीचा पुत्र आहेस. तुझ्या पित्याच्या अस्थींच्या साहाय्यानंच देवांनी वज्र नामक अस्त्र तयार केलं आणि त्या अस्त्राच्या* *साह्येकरूनच देवांना असुरांवर विजय मिळविणं शक्य झालं. तुझ्या पित्याचा मृत्यू झाला तेव्हा त्यांचं वय अवघं एकतीस वर्षांचं होतं.*
*बालक- माझ्या पित्याच्या अकाल मृत्युचं कारण काय होतं ?*
*नारद- तुझ्या पित्याची शनीची महादशा सुरु होती.*
*बालक- माझ्यावर हे असं भयानक संकट यायचं कारण काय असावं?*
*नारद- शनिदेवाची महादशा.*
*एव्हढं सांगून नारदानं पिंपळ वृक्षाची पानं आणि फळं खाऊन जगणाऱ्या त्या बालकाचं पिप्पलाद असं नामकरण केलं आणि त्याला ज्ञानाची दीक्षा दिली.*
*नारद निघून गेल्यानंतर बालक पिप्पलादनं नारदानं सांगितल्याप्रमाणे ब्रह्मदेवाची घोर तपश्चर्या करून त्यांना प्रसन्न करून घेतलं.ब्रह्मदेवानं पिप्पलादाला वर मागायला सांगितलं तेव्हा पिप्पलादनं 'मी ज्याच्याकडे पाहीन ते त्याच क्षणी भस्म होऊन जावं' असा वर मागितला. ब्रह्मादेवानं "तथास्तु" म्हणून पिप्पलादाला तसा वर दिला. हा वर मिळाल्याबरोबर पिप्पलादनं सर्वप्रथम शनिदेवांना आवाहन केलं. त्याबरोबर शनिदेव प्रगट झाले. शनिदेव समोर येताच पिप्पलादनं आपली नजर त्यांच्यावर रोखली. त्याबरोबर शनीच्या अंगाचा प्रचंड दाह होऊन त्यांचं शरीर जळू लागलं. हे पाहून समस्त ब्रह्माण्ड हादरलं. सूर्यपुत्र असलेल्या शनिदेवांना वाचवणं ब्रह्मदेवांनी पिप्पलादाला दिलेल्या वरामुळे देवांना अशक्य झालं. प्रत्यक्ष सूर्यदेवही आपल्या मुलाचं शरीर आपल्या नजरेसमोर जळताना पाहून ब्रह्मदेवाला त्याच्या प्राणांची भीक मागू लागले. शेवटी स्वयं ब्रह्म्यानं पिप्पलादाला त्यानं शनिदेवांना सोडून द्यावं अशी विनंती केली. पण पिप्पलादनं ती विनंती धुडकावून लावली. शेवटी ब्रह्मदेवानं पिप्पलादाला एका ऐवजी दोन वरदान देण्याचं कबूल केलं. मग मात्र पिप्पलादाला आनंद झाला आणि त्यानं ब्रह्मदेवाची विनंती मान्य केली. पिप्पलादनं ब्रह्मदेवाला दोन वर मागितले -*
*1- जन्मानंतर पहिली पाच वर्षे कुठल्याही बालकाच्या कुंडलीत शनीला स्थान असणार नाही ज्यामुळे यापुढे कोणताही बालक माझ्यासारखा अनाथ होणार नाही.*
*2- माझ्यासारख्य अनाथाला पिंपळ वृक्षानं आश्रय दिला आहे. म्हणून जी व्यक्ती सूर्योदयापूर्वी पिंपळ वृक्षाला जलार्पण करील त्या व्यक्तीवर शनीच्या महादशेचा कुठलाही प्रभाव पडणार नाही.*
*"तथास्तु" म्हणत ब्रह्मदेव तिथून गुप्त झाले. तेव्हा पिप्पलादनं आगीत जळणाऱ्या शनिदेवाच्या पायांवर आपल्या ब्रह्मदंडानं आघात करून त्यांना शापामुक केलं. ब्रह्मदंडाच्या आघातानं शनीचे पाय अधू झाले आणि त्यामुळे त्यांना पाहिल्यासारखं चालता येईना. म्हणून* *तेव्हापासूनच शनि "शनै:चरति य: शनैश्चर:" अर्थात जो हळू हळू चालतो त्याला शनैश्वर म्हटल्या जाते. आणि आगीमध्ये अंग भाजल्यानं शनीची काया काळी ठिक्कर पडली. .*
*शनीची मूर्ती काळी कां आहे आणि पिंपळ वृक्षाची पूजा कां केली जाते याचं रहस्य वरील कथेत दडलेलं आहे. पुढे पिप्पलादनं प्रश्नोपनिषदाची रचना केली. आजही हे उपनिषद ज्ञानाचं कधीही न संपणारं भांडार म्हणवल्या जातं.*