Thursday 3 August 2017

८ महिन्याचा बाळाचा आहार तक्ता ( फूड चार्ट)

८ महिन्याचा बाळाचा आहार तक्ता ( फूड चार्ट)


बाळाचा आठवा महिना पालकांसाठी फारच आश्चर्यकारक असू शकतो. तो लहानसा जीव स्वतःच इवलसं  शरीर उचलून जेव्हा आपल्या हातातला चमचा हिसकावू पाहतो, तेव्हा आपण समजायचा कि त्याला  स्तनपानाचा  कंटाळा आलेला आहे आणि आता  चिमुकल्यासाठी आईने नवीन आहार सुरु करायची हिच योग्य वेळ आहे.

सोमवार

सॉरी चिमुकल्यानो! तुम्ही आता आईच्या दुधाला जरी कंटाळला असाल, तरी ती अशी गोष्ट आहे जी तुम्ही सध्यातरी  बुडवू शकत नाही. म्हणूनच तुमचा नाष्टा म्हणजे, पोटभर स्तनपान होय. नाष्टा झाल्यावर काही वेळाने, पण जेवणाआधी बाळाला त्याचा आवडीप्रमाणे गाजर किसून (कुस्करून) अथवा शिजवून द्यावे. जेवणामध्ये मुगाचा डाळीची खिचडी, त्यानंतर संध्याकाळी स्तनपान. रात्री एकदा पुन्हा कुस्करलेले गाजर अथवा उकडलेला बटाटा द्यावा, आणि झोपताना पुन्हा एकदा स्तनपान देऊन बाळाला झोपवावे.

मंगळवार

मंगळवारची सुरवात बाळाला उठल्यावर व नाष्ट्याच्या वेळी स्तनपान देऊन करावी. नाष्टा झाल्यावर काही वेळाने, बाळाला किसलेल्या सफरचंदाची चव चाखावावी. जेवणामध्ये त्याला भाज्यांचा सूप पाजावा. त्यानंतर संध्यकाळच्या थोडं आधी बाळाला स्तनपान द्यावे. रात्री बाळाला वेगवेगळ्या शिजवलेल्या भाज्या कुस्करुन द्याव्या. दिवसाचा शेवट बाळाला स्तनपान देऊन करावे.

बुधवार  

दिवसाची सुरवात स्तनपानाने करायची असा नियमच करावा. आता बाळाचा जेवणात अंडे सहभागी करण्याची उत्तम वेळ आहे. बाळाला उकडून कुस्करून  बारीक केलेलं अंडे जेवणाआधी खाऊ घालावे. दुपारच्या जेवणात  बाळाला, मऊ शिजलेलं  साधं वरण आणि भात खाऊ घालावा. संध्याकाळी स्तनपान व जेवणासाठी बाळाला गव्हाची लापशी खाऊ घालावी. स्तनपान देऊन बाळाला झोपवावे.

गुरुवार

दिवसाची सुरवात व नाष्टा स्तनपानाने झाल्यानंत्तर, बाळाला कुस्करलेला टोफू खाऊ घालावा. जेवणासाठी शिजवून कुस्करलेले चणे व शिजवून मऊ भाज्या पातळसर करून द्याव्यात. संध्याकाळी त्याला सफरचंदाची लापशी  खाऊ घालावी. बाळाला संध्यकाळाच्या  जेवणाआधी  व  रात्री अगदी झोपताना  स्तनपान  देण्यास विसरू नये

शुक्रवार

पुन्हा एकदा दिवसाची सुरवात व नाष्टा स्तनपान देऊन करावी. आज आपल्या बाळाला पोळीच्या लहान लहान तुकडे करून त्या बरोबर  मस्त लोण्याची चव चाखावावी.  भाज्यांचं  सुप व मुगाची खिचडी हे समीकरण आजच्या जेवणासाठी उत्तम असेल. तसेच त्यानंतर काही वेळाने स्तनपान देऊन संध्याकाळी केळी आणि ओट्सची लापशी द्यावी. बाळाला नियमांप्रमाणे जेवणाआधी व झोपण्याआधी स्तनपान द्यावे.

शनिवार

अरे वा! शनिवार आला. आठवडा आता संपणार.आज चिमुकल्यांच्या दिवसाची सुरवात , सफरचंदाचं  अथवा गाजराचं  सूप पाजून उत्साहपूर्ण करा. नक्कीच सूप स्तनपान नंतर थोड्या वेळाने पाजावं. जेवणासाठी टोमॅटोची आमटी आणि मऊ भात खाऊ घालावा.  संध्याकाळी स्तनपान देण्याआधी चांगलाच दोन- तीन  तास वेळ जाऊ दया . रात्रीचा जेवणात बाळला   मऊ इडली सध्या आमटीमध्ये  कुस्करून खाऊ घाला आणि झोपण्याआधी स्तनपान देण्यास विसरू नका

रविवार

सुरवात बाळाला उठल्यावर  स्तनपान देऊन करावी व त्यानंतर थोडा वेळ जाऊ दिल्या नंतर घरी विरजण घालून केलेल्या आदमोऱ्या दह्यामध्ये थोडी साखर घालून ते बाळाला त्याची चव दयावी. आज बाळाला जेवणासाठी  दलिया खिचडी खावू घालून बघा व त्यानंतर थोड्या वेळाने  स्तनपान द्या. रात्रीचा जेवणासाठी बाळाला रव्याची किंवा सफरचंदाची लापशी द्यावी, आणि झोपण्याआधी स्तनपान द्यावे.

सर्व मातांनी लक्षात घ्या कि प्रत्येक बाळाची आहार क्षमता वेगवेगळी असते. जर आपल्या बाळाचं  पोट पाच – सहा वेळी खाल्ल्यानंतर भरत असेल, तर त्यात अनैसर्गिक आणि काळजी करण्यासारखं काही नाही. आहारात नव -नवीन पदार्थांचा सहभाग केल्याने बाळाला वेगवेगळ्या चवींची जाणीव होईल.आहारातील या बदलांमुळे बाळाला त्या पदार्थाचा आकार, चव  यांमधील  वेगळेपण  जाणवायला लागेल व विविध पदार्थ खाण्याची सवय त्याला लागेल. परंतु जर एखादा पदार्थ खाल्यानंतर दरवेळी बाळ सारखं उलटी करत असेल किंवा त्याला जुलाब होत असेल तर त्यावेळी वैद्याचा सल्ला घ्यावा